50 वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांचा कुटुंबासह श्रीक्षेत्र गांगेश्वरला स्नेहमेळावा ;मै त्रिणींना पैठणी तर मित्रांना टी-शर्ट भेट

50 वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांचा कुटुंबासह श्रीक्षेत्र गांगेश्वरला स्नेहमेळावा ;मै त्रिणींना पैठणी तर मित्रांना टी-शर्ट भेट 



पिंपळनेर,दि.20(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)न्यू इंग्लिश स्कूलच्या 1976 जगातील दहावीच्या वर्ग मित्र-मैत्रीणींचा स्नेह मेळावा चिकसे येथील श्रीक्षेत्र गांगेश्वर येथे पार पडला.सत्तरीच्या दशकात इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी प्रवेश घेऊन 1976 साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्वल भविष्याचे स्वप्न मनात बाळगून अनेक जण व्यवसाय नोकरी निमित्त परगावी स्थायिक झाले होते. त्या काळात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा क्वचितच असल्यामुळे पिंपळनेर व परिसरात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांकडे अनेक मुलं-मुली शिक्षणासाठी पिंपळनेरात दाखल झाले होते. दहावी नंतर मात्र अनेक मित्र मैत्रिणी एकमेकांपासून निरोप घेऊन दूर गेले होते.तब्बल पन्नास वर्षानंतर दहावीत एकत्र शिक्षण घेणारे सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कुटुंबासह एकत्र आले.     पांझरा-जामखेली-विरखेली या नदीच्या त्रिवेणी संगमावर उभे असलेले श्री शंकराच्या प्राचीन मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप बधान तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक शामकांत कोठावदे, फार्मसी उद्योजक नरेंद्र कोतकर,सेवानिवृत्त प्राचार्य श्रीराम पाटील,सुभाष जगताप,प्राचार्य डॉ.दीपक शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी सर्व मित्र-मैत्रिणींनी आपापला परिचय देऊन दहावी नंतर पुढे काय केले? व्यवसाय,नोकरी, कुटुंब,वास्तव्याचे ठिकाण, मुलांचे करियर याबाबत एकमेकांना माहिती दिली.त्या ठिकाणीच सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.त्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालय म्हणजेच त्या काळाची न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला भेट दिली.कौलारू खोल्यांचे रुपडे बदलून आता तीन मंजिली इमारत उभी राहिली आणि तेथे 'डिजिटल रूम' सुरू करण्यात आल्याचे पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.शाळेतील वर्ग खोल्यांना माजी संस्थापक संचालक, माजी मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांची नावे दिलेली नावे व त्यांचे छायाचित्र तेथे पाहून शाळा सोडतानाचे व त्यावेळचे त्यांना अध्यापन करणारे शिक्षकांचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. 

त्यानंतर वर्गमित्र दिलीप बधान यांच्या सेयान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रात्री दहा वाजेपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी शालेय दिवसातील किस्से सांगितले.कविता व गाण्यांची मैफिल सजली. रात्रीचे जेवण झाले.दुसऱ्या दिवशी गुजरात राज्यातील तीर्थक्षेत्र शबरीधाम येथे सर्व मित्र-मैत्रिणी पोहोचले. निसर्गरम्य व घनदाट जंगल तसेच डोंगराच्या शिखरावर असलेल्या शबरी मातेच्या मंदिरात दर्शन घेतले.पंपास सरोवरावर जाऊन तेथील मंदिरात दर्शन घेतले.वयाचे 65-66 वर्ष पूर्ण केलेल्या वर्ग मित्र बालपणात केलेल्या खोड्या,गमती-जमती,नकला करून जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले.  वर्ग मैत्रिणींना व मित्रांच्या सहचारिणींना पैठणी भेट देण्यात आली.तसेच वर्गमित्र व वर्गमैत्रिणींच्या पतीराजांना टी-शर्ट व स्मृतिचिन्ह तसेच सेयान इंटरनॅशनल स्कूलचे कॅलेंडर भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्यामकांत कोठावदे,दिलीप बधान,नरेंद्र कोतकर,सुभाष जगताप,प्रा.श्रीराम पाटील, प्रा.दीपक शिंदे,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जगताप,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुनील सोनवणे, इंजिनीयर दिलीप एखंडे, आरटीओ राजेंद्र शिंपी,दिलीप क्षीरसागर,प्रा.विलास घरटे, प्रकाश नेरकर,भानुदास भदाणे,दिलीप चौधरी,डॉ. माणिक निकम, बीएसएनएलचे निवृत्त इंजि. नानासाहेब बर्डे,भगवान दशपुते,चंद्रकांत कोठावदे, मंगला खैरनार यांनी परिश्रम घेतले.50 वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी कुटुंबासह सलग दोन दिवस स्नेह मेळाव्याला उपस्थित झाल्यानंतर सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new