पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुरुस्तीला हिरवा कंदील
पिंपळनेर,दि.2(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या 752 जी या राष्ट्रीय महामार्गाचे दीड किमी अंतराचे नूतनीकरण व रूंदीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले असून या कामासाठी म्हणजेच महामार्गाच्या अस्तित्वातील डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागाची दुरुस्तीचे काम करण्यास एमएसआरडीसी मुंबई यांनी हिरवा कंदील दिला आहे. या कामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे दीड किमीचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण प्रलंबित आहे.स्थानिक व्यावसायिक वा मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने काम झाले नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे शहादा, तळोदा ते शिर्डी हा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 अडकला आहे.शहरातून जाणाऱ्या महार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात अनेकवेळा याच रस्त्यावर अपघात घडले आहेत.वाहनांच्या चाकाखालून उडणाऱ्या खडीमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.धुळीचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढला आहे.या रखडलेल्या कामासाठी नागरिकांनी आंदोलने देखील केले आहेत.या महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आता चालना मिळणार आहे. पूर्वीचाच अस्तित्वात असलेला रस्त्याच्या पृष्ठभागाचे डांबरीकरण करण्यास राज्य विकास महामंडळाने मंजुरी दिली आहे.रस्त्याच्या पृष्ठभागाचे डेन्स बिट्मिनस मेकॅडमचा वापर करून हा रस्ता बनविण्यात येणार आहे. डीबीएम लेयरची जाडी डिझाईन वैशिट्यांवर आणि रहदारीच्या आवश्यकतावर शक्यता तपासून त्या क्षमतेचा रस्ता बनविला जाणार आहे. रस्ता मजबूत व टिकाऊ बनावा ही नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावरून 50 ते 60 टन वजनाची वाहने जातात.यामुळे रस्ता अवजड वाहतूकीचा विचार करून भक्कम तयार करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.*न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष*महामार्गाच्या दोन्ही बाजुला असणारे व्यावसायिक आणि नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील निर्णय अजुन प्रलंधित आहे.यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
छाया:अंबादास बेनुस्कर