गावठी पिस्टलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्यास मुद्देमालासह घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांची संयुक्त कारवाई
पिंपळनेर,दि.8(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)गोपनिय माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या सराईत घरफोड्याच्या सखोल चौकशीत त्याने केलेल्या चोरीचा 2 लाख 42 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात धुळे एलसीबीला यश आले आहे. यात 25 हजार रूपये किंमतीचा एक गावठी कट्टा, एक जीवंत काडतूस,70 गोण्या सोयाबीन,इन्व्हर्टर, बॅटरी,हॅण्ड ग्राइंडरचा समावेश आहे.अधिक वृत्त असे की,साक्री तालुक्यातील सामोडे गाव शिवारात दि.28 ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान शाम शांताराम भदाणे यांच्या लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रिज नावाचे पत्रटी गोडावून चोरट्याने फोडले.या चोरीच्या घटनेत गोडावूनमधील 2 लाख 17 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.यात वेल्डींग मशीन, रोटर,नांगर,कल्टीव्हेटर,हॅण्ड ग्राइंडर आदी वस्तूंचा समावेश आहे.सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतांना दि.6 जानेवारी रोजी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांना सदरचा गुन्हा हा गुजरात राज्यातील गव्हाण,ता.उच्छल,जि.वापी येथील रमेश शिवा वसावा याने केल्याची माहिती मिळाली.त्या अनुषंगाने पोनि श्रीराम पवार यांनी पथकास कारवाईच्या सुचना केल्या. धुळे एलसीबी व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने ओटा बारी (पिंपळनेर) येथुन संशयित रमेश शिवा वसावा (41) यास ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशीत त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान,त्याच्या अंगझडतीत 25 हजार रूपये किंमतीचा एक गावठी कट्टा व तीन हजार रूपये किंमतीचे एक जीवंत काडतूस आढळून आले.दरम्यान पिंपळनेर-सामोडे रस्त्यावरील भरत गॅस गोडावूनजवळील शेतातील कांद्याच्या चाळीत ठेवलेल्या 70 सोयाबीनच्या गोण्या चोरी झाल्याची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली.त्यामुळे धुळे एलसीबीचे पोनि श्रीराम पवार यांनी रमेश शिवा वसावा याचेकडे यासंदर्भात कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत 70 सोयाबीनच्या गोण्या पांगरण,ता.नवापूर येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली.दरम्यान,एका पाठोपाठ दोन गुन्हे मुद्देमालासह उघडकीस आल्याने पोनि श्रीराम पवार यांनी रमेश वसावाची अधिक चौकशी केली असता त्याने बोपखेल येथील प्रभात बियर शॉपीत चोरी केल्याचीही कबुली दिली.या चोरीत त्याने एक 15 हजार रूपये किंमतीचे इन्व्हर्टर व बॅटरी लंपास केल्याचे निष्पन्न झाले.सदरचा मुद्देमाल त्याने नवापूर तालुक्यातील पांगरण या गावात लवपून ठेवल्याची कबुलीही दिली.अशा प्रकारे रमेश शिवा वसावा याच्या चौकशीअंती3 हजार रूपयांचे हॅण्ड ग्राइंडर,25 हजार रूपये किंमतीचे लोखंडी टिलर,1 लाख 71 हजार 800 रूपये किंमतीच्या 70 सोयाबीनच्या गोण्या,25 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा,3 हजार रूपये किंमतीचे एक जीवंत काडतूस व 15 हजार रूपये किंमतीचे इन्व्हर्टर व बॅटरी असा एकूण 2 लाख 42 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.दरम्यान,अधिक चौकशीत रमेश शिवा वसावा याचेवर गुजरात राज्यातील उच्छल पोलीस ठाण्यात दोन,व्यारा पोलीस ठाण्यात एक,नवापूर पोलीस ठाण्यात एक,खापर, साक्री व नाशिक ग्रामीण मधील ताहराबाद पोलीस ठाण्यात प्रत्येक एक अशा सात गुन्ह्याची नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्रीराम पवार,पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि किरण बर्गे,पोउनि ईश्वर शिरसाठ,असई संजय पाटील,पोहेकॉ सदेसिंग चव्हाण,तुषार सुर्यवंशी,देवेंद्र ठाकुर,पोकों निलेश पोतदार, सुनिल पाटील,अतुल निकम, हर्षल चौधरी,चापोहेकॉ कैलास महाजन तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोकों चेतन गोसावी,रविंद्र सुर्यवंशी,कैलास कोळी आदींच्या पथकाने केली.