इंदवेतील दोन बालकांना डेंगूसदृश्य आजाराची लागण;अस्वच्छतेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

इंदवेतील दोन बालकांना डेंगूसदृश्य आजाराची लागण;अस्वच्छतेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात


पिंपळनेर,दि.20(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील इंदवे गावात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहेत.तुंबलेल्या गटारी,विखुरलेला कचरा,दुर्गंधी,गल्ली बोळात अस्वच्छता यामुळे गावात दोन बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग मात्र मूग गिळून असून,इंदवे येथील प्रशासकाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.इंदवे ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीत प्रशासकाची नियुक्ती झाली. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतच्या प्रशासनाचे असल्याचे दिसून येत आहे.प्रशासक औपचारिकता म्हणून कामकाज पाहत असून,हीच बाब स्वच्छतेत अडथळा निर्माण करीत आहे. प्रशासकांच्या कामात सुसूत्रता नाही.तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी सफाई कामगाराची कायमस्वरूपी नियुक्ती केली नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य आहे.डेंगूसदृश्य आजाराचे लागण झालेले बालक धुळे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्याची नोंद इंदवे येथील उपआरोग्य केंद्रात नाही.इंदवे येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रात लॅब नाही. यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी शहरातील खासगी लॅबमध्ये धाव घ्यावी लागते.खासगी दवाखान्यातच उपचार केला जातो. उपआरोग्य केंद्रांमध्ये लॅब नसल्याने बहुतांश रुग्ण तेथे टाळतात इंदवे येथे डेंग्यू सदृश्य आजार पसरत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशावेळी साफसफाईला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अस्वच्छतेने गावाची अवस्था बकाल झाली असताना याकडे लक्ष देण्यास मात्र प्रशासकाकडे वेळ नाही. ग्रामपंचायतीने साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.तसेच आरोग्य विभागानेसुद्धा नागरिकांच्या आरोग्यासाठी जागृत होणेही तेवढेच गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new