साक्रीत मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी.
पिंपळनेर,दि.28(अंबादास बेनुस्कर)
निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने निवडणुक कामी नियुक्त साक्री तालुक्यातील मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण साक्री येथील बालआनंद नगरी व न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडले. या प्रशिक्षण केंद्रात साक्री विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर,साक्रीचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, साहेबराव सोनवणे, पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ,साक्री नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दीपक पाटील यांनी मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी क्र. 1,2 व 3 यांची कार्ये, कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.यात मतदान केंद्रांची रचना,मंत्रांची मांडणी,मतदान प्रक्रिया,उमेदवार प्रतिनिधी नेमणूक,मतदाराची ओळख पटविण्यासाठीचे ओळखपत्रे, मतदान सुरू होण्यापूर्वी,सुरू असताना व संपल्यानंतर भरावयाचे कागदपत्रे,बॅलेट यूनिट,कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीन यांची जोडणी,प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर करावयाची यंत्राची 'सिलिग',संविधानिक व असंवैधानिक लिफाफ्यात जमा करावयाची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.मतदान प्रक्रियेची माहिती भरत असताना प्रपत्रातील माहिती मधील किरकोळ बदल तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबतही माहिती दिली. त्यानंतर यंत्र जोडणी कशी करावी,अभिरूप (मॉकपोल) मतदानानंतर 'सी.आर.सी.', पट्टीसील, टॅगसील आदींबाबत मतदान अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष यंत्र हाताळणी करून प्रशिक्षण देण्यात आले.याकामी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी, महसूल विभाग,कृषी विभाग, भूमी अभिलेख,पंचायत समिती,बांधकाम विभाग व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षिकांना इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.त्यांना कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये.निवडणूक प्रक्रिया राबवताना मनात भीती राहू नये म्हणून तहसीलदार सोनवणे यांनी अत्यंत सुटसुटीत व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.साकी तालुक्यात एकूण 402 मतदान केंद्र असतील. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या या निवडणुकीवेळी 32 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.या निवडणुक प्रक्रियेसाठी नियुक्त प्राथमिक,माध्यमिक मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षिका,उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी अशा मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यावेळी पार पडले.यापैकी सकाळ सत्रात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्र.1असे 1229 व दुपार सत्रात मतदान अधिकारी क्र.2 व 3 या इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 1049 अशा एकूण 2278 मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले,यात 522 महिला मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मतदान अधिकाऱ्यांची संख्या कमी पडली तर आणखी काही कर्मचाऱ्यांना मतदान अधिकाऱ्याची जबावदारी देण्यात येऊ शकते,असे तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक शौकत पिंजारी व ग्राम,महसूल अधिकारी सचिन चौरे यांनी सांगितले.साक्री तालुक्यात बीएलओ यांची संख्या 402 आहे.
दोन्ही सत्रात प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबावदाऱ्या याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रशिक्षणार्थीच्या प्रश्नांची उत्तरे येऊन त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरण केले. निवडणूक प्रक्रियेमध्ये जबाबदारी पार पाडणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांच्या टपाली मतदानासाठी यावेळी अर्ज जमा करून घेण्यात आले.दोन्ही प्रशिक्षण सत्रांसाठी साक्रीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, साक्रीचे निवासी नायव तहसीलदार चंद्रकांत शिपी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे यांच्यासह नायब तहसीलदार बापू बहिरम, राजेंद्र सोनवणे,राजेंद्र चौधरी, विशाल कागणे,तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी सहकार्य केले.प्रशिक्षणानंतर मतदान अधिकान्यांची ऑनलाइन टेस्ट*
दोन्ही सत्रात निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण घेणान्या सर्व मतदान अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वर्ग व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण संपल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने चाचणी घेण्यात आली.या चाचणीमध्ये मतदान प्रक्रियादरम्यान पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच 'यंत्र सिलिग',विशिष्टप्रसंगी समस्या उद्भवल्यास करावयाची कार्यवाही यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आली होती. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले होते.या चाचणीत 50 गुणांसाठी 25 प्रश्न विचारण्यात आले होते. चाचणी संपल्यानंतर किती गुण मिळाले हे तात्काळ दिसत होते.त्याचसोचत कोणते प्रश्न चुकले आहेत,त्यांची योग्य उत्तरे कोणती आहेत,हे सुद्धा देण्यात आले होते.सदरची चाचणी तंत्रस्नेही शिक्षक कुंदन माळके यांनी गुगल फॉर्मवर तयार केली होती. जिल्ह्यात अशा प्रकारची मतदान अधिकाऱ्यांची ऑनलाइन टेस्ट फक्त साक्री येथे घेण्यात आल्याचे कुंदन माळके यांनी सांगितले.
विधानसभेचे पहिले प्रशिक्षण*साक्री तालुक्यातील सर्व मतदान अधिकाऱ्यांनी विधानसभेचे पहिले प्रशिक्षण घेतले आहे.प्रशिक्षणानंतर'ऑनलाईन टेस्ट'ही घेण्यात आली.परंतु प्रत्यक्ष मतदानावेळी अडचणी उद्भवणार नाहीत,मतदान प्रक्रिया,मतदानानंतरचे विविध कर्तव्य यासंबंधी निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी पुढचे प्रशिक्षणही सर्व मतदान अधिकाऱ्यांनी जबाबदारीने घेऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी.मतदान यंत्रे नादुरुस्त होणे,मतदान केंद्रावर निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत समस्या निर्माण झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.साहेबराव सोनवणे, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, साक्री
छाया:अंबादास बेनुस्कर