सामोडे शिवारात 49 क्विंटल कांदा चोरट्यांनी केला लंपास; गुन्हा दाखल
पिंपळनेर,दि.30(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील सामोडे येथे अज्ञात चोरट्यांनी कांद्याच्या गोडाऊनमधील तब्बल 49 क्विंटल कांदा लांबविला आहे. चोरीस गेलेल्या कांद्याची किंमत 1 लाख 96 हजार रूपये इतकी आहे.ऐन दिवाळीत कांदा व्यावसायीकास मोठा आर्थिक फटका बसला आहे.दरम्यान कांदा चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साक्री तालुक्यातील मलांजन येथील रहिवासी हर्षवर्धन सोनवणे यांच्या पत्नी स्मिता सोनवणे यांचा कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.ते खरेदी केलेला कांदा हा सामोडे शिवारातील आशापुरी काट्याजवळील आदित्य ट्रेडींग नावाच्या गोडाऊनमध्ये ठेवतात.दरम्यान रात्री साडेदहानंतर देखरेखीचे काम करणारे अनिल वानखेडे हे जेवणासाठी घरी गेले असता या संधीचा फायदा घेत रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी 140 गोणीत भरून ठेवलेला 1 लाख 96 हजार रूपये किंमतीचा 49 क्विंटल कांदा चोरून नेला आहे.यासाठी चोरट्यांनी वाहनाचा वापर केला असल्याचे समजते.सकाळी आठ वाजता वानखेडे हे गोडाऊनवर आले असता कांदा चोरी झाल्याचे दिसून आले.याबाबत त्यांनी तात्काळ नवापूर येथील प्राथमिक शिक्षक हर्षवर्धन सोनवणे यांना घडलेला प्रकार सांगितला.याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात हर्षवर्धन सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सपोनी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुषण शेवाळे करीत आहेत.