30 ग्रॅमची गहाळ झालेली सोनपोत पोहचली निजामपूर पोलिसांमार्फत पुन्हा वृध्देकडे
पिंपळनेर,दि.5(अंबादास बेनुस्कर)
साक्री तालुक्यातील जैताणे येथे वास्तव्यास असलेल्या एका वृध्देची 30 ग्रॅम वजनाची 90 हजार रुपये किंमतीची सोनपोत जैताणे ग्रामपंचायतीजवळ असलेल्या सेंट्रल बँकेत गहाळ झाली. त्यानंतर वृध्देने निजामपूर पोलीस ठाणे गाठत रितसर फिर्याद नोंदवली.पोलिसांचा तपास सुरु असतांना ज्यांना सदरची सोनपोत सापडली होती त्यांनी स्वतःनिजामपूर पोलीस ठाण्यात येत ती पोलिसांच्या हवाली केली. त्यानंतर निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय मयुर भामरे यांनी सदर वृध्देस पोलीस स्टेशन येथे बोलावून सोनपोत वृध्देच्या हवाली केली.अधिक वृत्त असे की,सौ.अरुणाबाई देवीदास न्याहळदे(58),रा. जैताणे,ता.साक्री हि वृध्दा दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत जैताणे जवळील सेंट्रल बँकेत आधार कार्ड लिंकींगसाठी गेली होती.बँकेत गर्दी असल्याने व्यवस्थापकाने त्यांना थोडावेळ थांबण्याचा सल्ला दिला.परिणामी,सदर वृध्दा ही बँकेतील महिलांच्या रांगेत बसली.तत्पूर्वी अरूणाबाई यांनी गळ्यातील दोन सोन्याच्या मंगलपोत काढून जवळील पिशवीत ठेवल्या.मंगलपोत पिशवीत ठेवत असतांना 90 हजार रूळपये किंमतीची सोनपोत अनावधानाने पिशवीत न पडता जमिनीवर पडली. त्यानंतर बँकेतील काम न झाल्याने सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अरूणाबाई ह्या घरी परतल्या.घरी आल्यावर पिशवीतील मंगलपोत काढतांना एक मंगलपोत मिळाली मात्र दुसरी मंगलपोत मिळुन आली नाही. त्यानंतर अरूणाबाई यांनी वेळ वाया न घालवता निजामपूर पोलीस ठाणे गाठून घडला वृत्तांत कथन केला.त्यानुसार निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.या फिर्यादीत त्यांनी बँकेत त्यांच्या जवळ असणाऱ्या दोन महिलांपैकी कुणीतरी सोनपोत लंपास केल्याचा संशयही व्यक्त केला. दरम्यान,निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय मयुर भामरे यांनी तपासाची चक्रे गतीमान केली.यात सीसीटिव्ही फूटेजची तपासणी केली.मात्र बँकेत सर्वत्र सीसीटिव्ही असल्या कारणाने ज्याने सदरची मंगलपोत उचलली होती.त्यांना निजामपूर पोलीस तपास करीत असल्याचे समजले.त्यानंतर सदरची मंगलपोत त्रयस्थामार्फत निजामपूर पोलीस ठाण्यात एकाने आणुन दिल्याचे एपीआय मयुर भामरे यांनी सांगितले.दरम्यान,सदरची मंगलपोत एपीआय मयुर भामरे यांनी सौ.अरुणाबाई न्याहळदे यांना निजामपूर पोलीस ठाण्यात बोलावून परत केली.सोनपोत मिळाल्याने सौ.अरुणाबाई न्याहळदे यांनी देखील समाधान व्यक्त केले.