दुसाने येथे जुगार अड्ड्यावर छापा;दोन मोटारसायकल,पाच मोबाईलसह 1 लाख 44हजाराचा मुद्देमाल जप्त
पिंपळनेर,दि.9(अंबादास बेनुस्कर)
साक्री तालुक्यातील निजामपूर हद्दीतील दुसाने गावातील शशी नगर जवळील एका बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये निजामपूर पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाऱ्यांना दणका दिला आहे.या कारवाईत दोन मोटारसायकल,पाच मोबाईलसह सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील दुसाने गावात जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे यांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांच्या पथकाने दुसाणे गावाच्या बाहेर शशी नगर जवळ एका बंदीस्त पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला.त्या ठिकाणी दीपक शिवाजी सोमवंशी (41),वसंत राघो बागुल (36),विजय राघो बागुल(36)तिघे रा.शशीनगर, ता.साक्री,संदीप गोकूळ भदाणे (27),तुषार नानाभाऊ खैरनार रा.दुसाणे, बसस्थानकजवळ ता.साक्री हे पाच जण जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी सदर ठिकाणाहून दोन मोटारसायकल तसेच जुगार खेळणाऱ्यांच्या अंगझडतीतून पाच मोबाईल तसेच 40 हजार रुपयांचा रोकड असा एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय अधिकारी एस.आर.बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग पवार,पोकॉ परमेश्वर चव्हाण,फुलसिंग वसावे,गौतम अहिरे यांच्या पथकाने केली.