डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर
युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक
पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने हे शिबीर डिजिटल मिडिया क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. अशा पध्दतीची कार्यशाळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी केले आहे.प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया नंतर आता डिजिटल मिडियाचं युग आलं आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर 5000 पेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स चालविले जातात. सुमारे 10,000 पेक्षा जास्त पत्रकार या प्लॅटफॉर्मवर काम करतात. मात्र पुरेशा तांत्रिक माहिती अभावी बहुतेकजण व्यावसायिकदृष्टया यशस्वी होताना दिसत नाहीत. ही गोष्ट अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या लक्षात आल्यानंतर परिषदेने वर्षभरात विविध भागात अशा पाच कार्यशाळा घेण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यशाळेतून मान्यवरांचे मार्गदर्शन सहभागींना मिळणार आहे.यातील पहिली कार्यशाळा 20 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात होणार आहे. या क्षेत्रातले दिल्ली, लखनौसह महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले मान्यवर शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.यामध्ये युट्यूब कसे सुरू करायचे, ते कसे चालवायचे, गुगलकडून जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कसे मिळवायचे ,डिजिटल माध्यमाबद्दलची सरकारी भूमिका, नियम यासह विविध तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन शिबिरात करण्यात येणार आहे.या शिबिरात केवळ 350 पत्रकारांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.युट्यूब चालविणारे किंवा चालवत असलेल्या पत्रकारांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरासाठी २०० रूपये शुल्क आकारले जाणार असून त्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवणही दिले जाणार आहे. या शिवाय सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. शिबिरात डिजिटल मिडियाची राज्य कार्यकारिणीही निवडली जाणार असल्याने संघटनात्मक कार्याची आवड असलेल्या इच्छुकांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे.या प्रशिक्षण शिबिराचा फायदा घेण्याचे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, डिजिटल मिडियाचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष सनी शिंदे, विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले,पिपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष महावीर जाधव आदिंनी केले आहे.